Advertisements

चालू घडामोडी (18 मे 2020)
आरोग्य सेतू अॅप सक्ती मागे :
- करोना टाळेबंदीदरम्यान सरकारी किंवा खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतू अॅप सुरू ठेवणे बंधनकारक करणारा आदेश केंद्र सरकारने रविवारी जाहीर केलेल्या टाळेबंदी-4 च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथील केला आहे.
- तर त्यानुसार आता, ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप चालू करणे शक्य आहे, त्या कर्मचाऱ्यांनी ते सुरू करावे, यासाठी संबंधित आस्थापनेच्या मालकाने पूर्ण प्रयत्न करावेत, असे सूचविण्यात आले आहे.
- त्याशिवाय, ज्यांच्या मोबाईल फोनवर हे अॅप चालू करणे शक्य आहे, त्या सर्व नागरिकांनी त्याचा वापर करावा, अशी सल्लावजा सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना करावी, असेही नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
- तसेच यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक होता. तसे न केल्यास संबंधित आस्थापनेस जबाबदार धरून कायदेशीर कारवाईची तरतूद केली होती.
- तर आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केंद्राचा हा निर्णय घटनात्मक चौकटीत बसत नसल्याचा आक्षेप याचिकादारांनी घेतला होता.
राज्यांची कर्जमर्यादा ‘जीडीपीच्या’ 5 टक्के :
- आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्यांना कर्ज उभारण्याची मर्यादा वाढवून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी जाहीर केला.
- राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्यांपर्यंत कर्ज उभारण्याची मर्यादा पाच टक्के करण्यात आली असली तरी चार अटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेल्या दूरचित्रसंवादावेळी कर्ज उभारण्याची मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनी केली होती. महाराष्ट्राने ही मागणी सातत्याने केली होती.
- तर सध्या राज्यांना राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपर्यंत खुल्या बाजारातून कर्ज उभारण्यास परवानगी आहे.
तसेच यात दोन टक्के वाढ करून राज्य सकल उत्पन्नाच्या पाच टक्के कर्ज उभारण्यास परवानगी देण्यात आली. - मात्र ही परवानगी सरसकट देण्यात आलेली नाही. यासाठी राज्यांना चार अटींची पूर्तता करावी लागेल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
- नव्या निर्णयामुळे राज्यांना अधिक 4 लाख 28 हजार कोटी रुपये उभे करणे शक्य होईल. सध्या तीन टक्के दराप्रमाणे 6 लाख 41 हजार कोटी कर्जाच्या माध्यमातून राज्यांना उपलब्ध होतील.
गटपातळीवरील आरोग्य केंद्रात संसर्गजन्य रोग विभाग :
- करोना काळात वैद्यकीय सुविधांची मोठी गरज असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सार्वजनिक आरोग्यासाठीची तरतूद वाढवण्याचे जाहीर केले.
- आरोग्य खर्चात वाढ करण्याशिवाय सरकारने आता गट पातळीवरील प्रत्येक ठिकाणी संसर्गजन्य रोग विभाग सुरू करणे, सरकारी निदान प्रयोगशाळा सुरू करणे हे निर्णय जाहीर केले असून त्यामुळे तळागाळापर्यंत चाचण्यांची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
- तर सध्या आरोग्यावर एक टक्क्य़ाच्या आसपास खर्च होतो. आगामी काळात करोनासारख्या आपत्तींना तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी यासाठी सुधारणा गरजेच्या आहे. त्यामुळे खेडेगावांमध्ये आरोग्य केंद्रे सुरू करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सीतारामन म्हणाल्या की, भविष्यकाळात अशा आपत्ती पुन्हा आल्यास त्याला तोंड देता यावे यासाठी सार्वजनिक आरोग्यातील गुंतवणूक वाढवण्यात येत आहे.
- साथीच्या रोग काळात ग्रामीण पातळीवर सरकारी प्रयोगशाळांची संख्या व जाळे वाढवल्याने आरोग्य पाहणी व तपासणीत सुधारणा करता येणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य रोग साथींचाही विचार करून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.
- तसेच ई संजीवनी दूरसल्ला सेवा सुरू करण्यात आल्या असून ई- आरोग्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरोग्य सेतू उपयोजनाच्या माध्यमातूनही देशातील हॉटस्पॉट ठरवण्यात मदत होत असून 10 कोटी लोकांनी आरोग्य सेतू उपयोजन डाऊनलोड केले आहे.
शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
- मागील तीन परिषदांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
- तर यावेळी सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले. डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत.
- तसेच सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी 12 चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचं होईल असं त्या म्हणाल्या.
- चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे 12 वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील.
- पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
- तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप 100 विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन :
- मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
- रत्नाकर मतकरी यांची 1955 मधे, वयाच्या सतराव्या वर्षी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.
- तर त्यांनी मराठीमध्ये बालसाहित्यापासून नाटकांपर्यंत विपुल साहित्य लेखन केले होते.
- मतकरींची ‘लोककथा 78’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोहोचवला.
- मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.
WHOमध्ये भारताला मोठे पद :
- भारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.
- कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.
- चीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे.
- भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
- भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे.
दिनविशेष :
- छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा 18 मे 1682 मध्ये जन्म झाला.
- भारताचे 11वे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 मध्ये झाला.
- 18 मे 1972 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
- भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी सन 1974 मध्ये 18 मे रोजी केली.
- पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने 18 मे 1998 रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
- श्रीलंका सरकारने 18 मे 2009 रोजी ‘एलटीटीई’ला पराभूत करून सुमारे 26 वर्षच्या युद्धाला संपवले.
Advertisements