Advertisements

चालू घडामोडी (10 जून 2020)
नितीन गडकरींकडून वाहनधारकांना दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय:
- मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
- त्यांच्या या निर्णयामुळे देशातील अनेक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत.
- अशांसाठी हा आदेश देण्यात आलेला आहे. ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 30 जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात सात केंद्रीय पथके:
- करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या १५ राज्यांतील ५० जिल्हे आणि महापालिका शहरांमध्ये पथके पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सात केंद्रीय पथके पाठविण्यात येणार असून, प्रतिबंधित क्षेत्रांत तांत्रिक मदत पुरविणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ही पथके करणार आहेत.
- तमिळनाडूमध्ये 7, आसाममध्ये 6, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशामध्ये प्रत्येकी 5, तेलंगण, हरयाणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी 4, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तराखंड, गुजरातमध्ये प्रत्येकी 3 केंद्रीय पथके पाठवण्यात येणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन सदस्य असतील.
- दोन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व संयुक्त सचिव दर्जाचा नोडल अधिकारी यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित जिल्हा वा शहरामधील आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील व गरजेनुसार वैद्यकीय सल्ला देतील. स्थानिक प्रशासनाने केंद्रीय पथकाशी समन्वय साधून करोनानियंत्रणाचे उपाय व निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- करोनासंर्भातील सर्वेक्षण, नियंत्रण, चाचणी आणि उपचार असे चार स्तरीय धोरण अवलंबले जात असून, त्यासाठी केंद्रीय पथकाची मदत घेण्यात येणार आहे.
- काही राज्यांमध्ये अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे केंद्राला आढळले आहे. चाचण्यांचे निष्कर्ष वेळेत न येणे, 10 लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण कमी असणे आणि रुग्णवाढीच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा कमी असलेल्या शहरांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. मृतांचे प्रमाण अधिक आणि रुग्णवाढ वेगाने होत असलेल्या भागांत करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ही पथके पाठवणार आहे.
- अनेक जिल्हा तसेच महापालिका शहरांमध्ये करोनासंबंधित पथक अस्तित्वात आहे. त्यांच्याशी केंद्रीय स्तरावरून समन्वय साधला जात आहे.
हैदराबाद आयआयटीकडून करोना चाचणी संच विकसित:

- हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोविड 19 चाचणी संच विकसित केला असून या किफायतशीर संचाच्या मदतीने वीस मिनिटांत चाचणी करता येते.
- संशोधकांनी असा दावा केला, की ही पर्यायी चाचणी पद्धत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या संचाची किंमत 550 रुपये असून ती जास्त उत्पादनानंतर साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली आणता येईल. या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
- या संचाला मान्यता मिळण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे. या चाचणी संचांच्या मदतीने वीस मिनिटांत निकाल हाती येतो. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येते, अशी माहिती हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी दिली. हा कमी किमतीचा संच असून कुठेही सहज नेता येतो.
- यातील चाचणी पद्धत वेगळी असून त्यात कोविड 19 जनुक आराखडय़ातील विशिष्ट भागाच्या क्रमवारीचा आधार घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीने त्यांच्या पीसीआर आधारित चाचणी संचाला आयसीएमआरकडून मान्यता घेतली आहे.
- हैदराबाद आयआयटी संस्थेने असा दावा केला, की सध्याच्या चाचणी प्रक्रिया या शोध प्रक्रियेवर आधारित आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चाचणी ही शोध आधारित नसल्याने त्याची किंमत कमी आहे शिवाय त्यात अचूकतेशी तडजोड करण्यात आलेली नाही.
अभिमानास्पद! भारतीय हवामान विभागाचं अचूक अंदाजाबद्दल जागतिक हवामान संघटनेकडून कौतुक:
- पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटाबद्दल भारतीय हवामान विभाग अंदाज व्यक्त करतो. त्याचबरोबर धोकादायक संकट असेल, तर आधीच सूचना करून प्रशासनाला सावध करण्याच काम करतो. मात्र, पावसाच्या अंदाजावरून अनेक वेळा हवामान विभागावर विनोदही केले जातात. मात्र, अम्फान चक्रीवादळाबद्दल भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानं जागतिक हवामान संघटनाही प्रभावित झाली आहे. याबद्दल भारतीय हवामान विभागाचं संघटनेनं कौतुक केलं आहे.
- बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं होतं. या चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना फटका बसला.
- या चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यांच्याविषयी इतर बाबींचे निरीक्षण नोंदवत भारतीय हवामान विभागानं आधीच दोन्ही राज्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. हे चक्रीवादळ 20 मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशात धडकले होते.
- भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अचूक अंदाजामुळे मालमत्तेचं नुकसान झालं असलं, तरी मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली. कारण दोन्ही राज्यांनी चक्रीवादळ येण्या आधीच फटका बसणाऱ्या भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.
- अम्फान चक्रीवादळाबद्दल व्यक्त केलेल्या अचूक अंदाजाची जागतिक हवामान संघटनेनंही दखल घेतली आहे. संघटनेनं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांच्या नावानं पत्र पाठवलं आहे. 2 जून रोजी हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यात जागतिक हवामान संघटनेचे महासचिव ई. मॅनएन्कोवा यांनी संघटनेला दिलेल्या अचूक माहितीबद्दल कौतुक केलं आहे.
- “भारतीय हवामान विभाग आणि विशेष प्रादेशिक हवामान केंद्रानं तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या चक्रीवादळाबद्दल अचूक अंदाज व्यक्त केला. वादळाची उत्पत्ती, त्याचा मार्ग, त्याची तीव्रता, जमिनीला स्पर्श करण्याचं ठिकाण व वेळ हे सगळं अचूकपणे सांगितलं. त्याचबरोबर हवामान, पाऊस आणि वाऱ्याचा वेग यांचा अंदाज याबद्दलही तातडीनं प्रतिसाद देत मदत केली,” असं जागतिक हवामान संघटनेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.
मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला ऐतिहासिक निर्णय; रयत क्रांती संघटना करणार स्वागत- सदाभाऊ खोत:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. शेतमाल आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासंदर्भातील मोदी सरकारचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत.
- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची त्यांनी सोडवणूक केली आहे. शेतकऱ्याला सर्वच बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. शेतकरी स्वतः आपल्या मालाचे मार्केटिंग आता करू शकतो, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत.
- त्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना येत्या ११ जूनला सकाळी ११ वाजता विजय दिवस साजरा करण्याचे आवाहन यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी झुम या ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन इंग्रजांनी केलेला 75 वर्षांचा काळा कायदा रद्द केला. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.
- सरकारला वाटेल तेव्हा कोणाताही शेतमाल अत्यावश्यक सूचित टाकण्याचा पूर्वीचा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा होता. नव्या कायद्याने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ग्रामीण भारताला ऐतिहासिक प्रोत्साहन देणाऱ्या व कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने हे एक दूरदृष्टीचे टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे.
- त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे मुक्तिदाता ठरणार आहेत. अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे तृणधान्ये, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, कांदा आणि बटाटा यांसारखी उत्पादने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे खासगी गुंतवणूकदारांना, आता नियमनांची आणि सरकारी हस्तक्षेपाची अवाजवी भीती असणार नाही.
- केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मदत होईल आणि वस्तूंच्या किमती स्थिर राहतील. तसेच साठवणूक सुविधांच्या अभावामुळे कृषीमालाचे होणारे नुकसान देखील कमी करता येईल.
- केंद्र सरकारच्या नव्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही कृषी उत्पादने खरेदी आणि विक्री करण्यात आवड-निवडीचे स्वातंत्र्य असेल. त्याशिवाय यामुळे नोंदणीकृत एपीएमसीच्या बाहेर, आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यापार करण्याची मुभा मिळणार आहे.
दिनविशेष :
- 10 जून : महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.
- अॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी 10 जून 1935 रोजी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.
- दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर 10 जून 1940 रोजी शरणागती पत्करली.
- दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध 10 जून 1940 रोजी युद्ध पुकारले.
- 10 जून 1982 पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
Advertisements